बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. प्रतापगड त्या दिवशी झिणझिणत होता. त्यानंतर अवघ्या तीन तासांत पृथ्वीच्या पोटात जे काही घडले, त्यामुळे माझ्या या विधानाला आणखीनच बळकटी येते आणि तरी त्या क्षणाला थोडीच कुणाला कल्पना होती? पण थांबा. अशी एकदम फास्टर फेणेसारखी उडी मारणे बरे नाही. ज्या वेळचे त्या वेळी सांगावे हेच बरे. प्रतापगडाला झिणझिण्या येत होत्या असे म्हणण्याचे माझे कारण आपले दर्शनी अन् आलंकारिक आहे. मुंग्यांची रांगच रांग किल्याच्या पाठीवरून चढत होती. काळ्या-तांबड्या नाही. पांढऱ्या शुभ्र धावऱ्या-चावऱ्या मुंग्यांची रांग. म्हणजे दुरून पाहणाऱ्याला त्या पांढऱ्या मुंग्या वाटल्या असत्या. किंवा फार तर मुंगळे. खरे तर ते पुण्याच्या विद्याभवन हायस्कूलचे मुलगे होते. त्यांच्यातला तो स्कॉलरब्रुव शरद शास्त्री, जन्या जोशी नि चकोर देशमुख, सुभाष देसाई वगैरे काही नग तुम्हांला माहीत असतील. निदान तो शेवटला नंबर तरी. कारण सुभाष ज्याचा जानी दोस्त तो किडकिडीत तुडतुडीत पळ्या पोर तुमचाही जानी दोस्त आहे. किंबहुना त्याच्याचसाठी तर हे सारे महाभारत मला लिहावे लागतेय. तो हो! याच विद्याभवनमधला-बनेश ऊर्फ फास्टर फेणे! प्रतापगड चढणाऱ्या त्या मुंगळ्यांमध्ये बारीक कंबरेचा हा वाळकुडा मुंगळाही आहेच. पण तो केव्हाच छलांग मारून फर्लांग पुढे गेला आहे. तो पाहा तिळाएवढा बारीक ठिपका... दिसला? आणि तो मागून चढणारा दुसरा पांढरा तीळ म्हणजे सुभाष देसाई. आपल्या मित्राच्या मागे तोही कडमडत गेलाय. सुभाषची स्पीड अर्थात बन्याच्या मानाने ‘नॉन’ असली, तरी हा गोरा गुटगुटीत मुलगाही कमी तरतरीत नि धाडसी नाही. तसा तो नसता, तर फास्टर फेणेचा कंठमणी बनलाच नसता.